9 February 2014

मुलांसाठी आहाराची पाठशाळा

अर्चना रायरीकर, आहारतज्ज्ञ

आजकाल शालेय अभ्यासक्रमात पोषणशास्त्र आणि चांगला आहार या विषयी धडे टाकलेले आढळून येतात. अनेक शाळांमधून मुलांना पौष्टिक नाश्ता आणि जेवण देखील दिलं जातं. अनेक शाळांत आहारतज्ज्ञ देखील असतात. ज्या शाळांत मुलांना जेवण दिलं जातं तिथल्या एका पालकांनी एक प्रातिनिधिक मत व्यक्त केलं. त्यांच्या मते मुलांना शाळेत सर्व भाज्या खायला लावल्या जातात. एखादी भाजी मुलांनी पानात टाकली किंवा आवडत नाही म्हणून सांगितलं, तर परत तेवढीच भाजी पानात वाढली जाते. असं झालं की मुलं सगळ्या भाज्या नीट खाऊ लागतात. हा झाला एक प्रकार. काही शाळांत मुलांच्या मेन्यूमध्ये पावभाजी, चायनीज वगैरे पदार्थही असतात. कारण एकच, मुलांना ते पदार्थ आवडतात.

मध्यंतरी काही जणांकडून अजून एक प्रकार ऐकला, तो म्हणजे काही ठिकाणी मुलांना शाळा सुटताना एनर्जी बार दिले जातात. त्यामुळे त्या कंपनीची जाहिरात होते म्हणे! पालकांना प्रश्न पडला, की असे प्रकार द्यावेत की नाहीत? त्या बार्सवर घटक लिहिलेले होते. त्यामध्ये कृत्रिम रंग आणि स्वाद होते. मग असे पदार्थ मुलांना द्यावेत का? विविध शाळांमध्ये असे अनेक प्रकार दिसतात. अजून एक प्रकार मी पाहिला आहे. साधारणपणे मध्यम किंवा उच्च मध्यमवर्गीय मुलं असलेल्या शाळांमध्ये प्रेझेंटेशन्स होतात. ही प्रेझेंटेश्न्स हेल्थ ड्रिंकच्या कंपन्या देतात. त्यांचे आहारतज्ज्ञ प्रेझेंटेशन देतात. त्यामध्ये सुरुवातीला योग्य आहाराबद्दल माहिती असते. मग हळूहळू त्याचं जे काही प्रॉडक्ट आहे, त्याबद्दल माहिती दिली जाते. शेवटी आमच्या या प्रॉडक्टमध्ये हे गुण आहेत, त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलाला ते नक्की द्या, असं मार्केटिंग करून पालकांना ते विकलंही जातं. मुळात आपल्याकडे जी काही हेल्थड्रिंक आहेत, त्यामध्ये ८० टक्के साखर असते. बाकी थोडी जीवनसत्त्व आणि क्षार, जोडीला कृत्रिम रंग आणि स्वाद असतात. आणखी एक मोठी गोष्ट असते, ती म्हणजे मोठमोठे दावे!

काही शाळांमध्ये पोषक आहार दिला जात नाही आणि अशा प्रकारच्या पदार्थांचं मार्केटिंगही होत नाही. शाळेची कमिटी काही निर्णय घेते. उदा. डब्यात रोज पोळी-भाजीच हवी किंवा आठवड्यातून एकदा सलाड किंवा फळं हवीत वगैरे. काही शाळा मॅगी, चिप्सवर बंदी घालतात. काही शाळा मुलांना आरोग्यपूर्ण पदार्थ तयार करणंही शिकवतात.
मुलांच्या आहार ज्ञानाचे दोन भाग आहेत, एक म्हणजे योग्य आहाराची माहिती देणं. दुसरा म्हणजे ते प्रत्यक्षात अमलात येत आहे की नाही, हे पाहाणं. यासाठी ही माहिती केवळ मुलांनाच नव्हे, तर शिक्षक आणि पालक यांनादेखील द्यायला हवी. मुलं ही ओल्या मातीसारखी असतात आणि याच काळात आपण त्यांना घडवू शकतो. यासाठीच शाळांमधून योग्य असं आहार शिक्षण देणं गरजेचं आहे. पालकांना नसणारा वेळ, सगळीकडे फास्टफुडचं असलेलं आकर्षण आणि त्याच्या अगदी विरुद्ध म्हणजे उठसूठ महागड्या शक्तीवर्धक गोळ्या आणि प्रोटिन पावडर खपवण्याची व घेण्याची चढाओढ, यात खाण्यातील नैसर्गिकपणा, शुद्धता, शिस्त सर्वच हरवत चाललं आहे. आपण मुलांचे अभ्यास, विविध उपक्रम यांना खूप महत्त्व देतो. तितकं महत्व आहाराला देत नाही. सध्या चुकीचा आहार आणि कमी व्यायाम यामुळे अनेक विकार बळावत चालले आहेत. मुलगा खूप शिकला, इंजिनीअर होऊन अगदी लाखो रुपये मिळवू लागला; पण त्याला २५व्या वर्षी मधुमेह झाला असं व्हायला नको. यासाठी आहाराची पाठशाळा हवीच. 

No comments:

Post a Comment