9 February 2014

कार खरेदीच्या पंचसूत्री

कार खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना मॅन्युफॅक्चर्स वा डिलर्स विविध सवलतींची खैरात करीत असतात. त्याचा लाभ घेताना खालील पाच बाबी लक्षात घ्या. 

नवे वर्ष, जुने मॉडेल 

साधारणातः कार कंपन्या गाड्यांच्या किमती वाढवण्यापूर्वी किंवा नव्या वर्षात जानेवारीमध्ये कारची नवी मॉडेल्स बाजारात आणण्यापूर्वी कारचा शिल्लक स्टॉक डिसेंबरच्या महिन्यात विकण्यासाठी काढतात. अशी कार विकत घ्यायला गेलात तर त्याचे मॉडेल काही दिवसांत गेल्या वर्षीचे मॉडेल ठरते. ही कार पुढील ७-८ वर्षे वापरणार असाल तर ठीक पण, ३-४ वर्षांत विकणार असाल तर या कारचे मॉडेल सन २०१३चे ठरते आणि त्याची रिसेलची किंमत कमी होते. त्यामुळे नवे वर्ष सुरू होईपर्यंत थांबा. नव्या कारची किंमत पुरेपूर वसूल होण्यास ८ वर्षांचा कालावधी लागतो. त्याचा पुरेपूर वापर करा. 

खिशाला परवडेल का बघा! 

मोठी कार मोठ्या सवलती असे आमिषाचे स्वरूप असते. पण, सवलतींचा आपल्या खिशावर परिणाम होऊ देऊ नका. कारची किंमत तुमच्या हाती येणा‍ऱ्या वार्षिक उत्पन्नाच्या ६० टक्क्यांपेक्षा जास्त असू नये. समजा. तुमचा हातात येणारा पगार ६० हजार आहे तर तुमच्या कारची किंमत ४.३२ लाखांपेक्षा जास्त नको. कारच्या कर्जावरील हप्ता हा तुम्ही दरमहा करभरल्यानंतर उरलेल्या पैशांच्या फक्त १५ टक्केच असायला हवा. किंवा सगळा खर्च आणि गुंतवणूक करून उरलेल्या पैशांच्या ४० टक्के इतकाच असावा. 

ऑफर बारकाईने पहा 

डिलर सवलती अधिक आकर्षक करण्यासाठी काही युक्त्या करीत असतात पण, त्यात फसू नका. जिलर अॅक्सेसरीजचे महत्त्व विनाकारण वाढवून ठेवतात. अॅक्सेसरीत गळ्यात टाकतात. त्यामुळे कुठल्या अॅक्सेसरीज हव्यात ते नीट पहा. फ्री अॅक्सेसरीजपेक्षा कॅश स्वरुपात सवलत मागा. एक्स्चेंज ऑफरच्या भानगडीत अजिबात पडू नका. जुन्या कारची किंमत ते कमी करतात. उलट तुम्हाला इतरत्र जास्त किंमत मिळू शकेल. त्यापेक्षा olx.inसारख्या वेबसाइटचा वापर करा. तुम्हाला योग्य किमतीत कार खरेदीदार उपलब्ध होईल. 

नो क्लेम बोनस 

यावर्षी कुठलाही क्लेम केला नाही तर पुढच्या वर्षी प्रिमियममध्ये सवलत मिळते हे सर्व कारमालकांना माहिती असते. पण, नोक्लेम बोनस दुस‍ऱ्या वाहनासाठीही ट्रान्स्फर करता येतो. त्यामुळे नव्या कारचा विमा कमी होऊ शकतो, हे अनेकांना माहिती नसते. जुनी कारच्या विक्रीकराराची फोटोकॉपी, ट्रान्स्फरची कागदपत्रे, विम्याची कागदपत्रे, कारचे नोंदणीपत्र आदी कागदपत्रे दिली तर नव्या कारच्या विम्यात सवलत मिळू शकते. समजा नव्या कारच्या विम्याची किंमत १५ हजार रुपये असेल तर ५० टक्के नोक्लेम बोनसमुळे विम्यासाठी ७,५०० रुपयेच भरावे लागेल. विम्याच्या तारखेपासून तीन वर्षे हे सर्टिफिकिट वैध ठरते. पण, जुन्या कारचा विम्याचा नोक्लेम वापरत असल्याचे मात्र ही गाडी खरेदी करणा‍ऱ्या ग्राहकाला स्पष्ट सांगितले पाहिजे. कारण कारसोबत विमाही येतो असे गृहित धरले जाते. 

पेट्रोल, डिझेल की सीएनजी? 

इंधनांमध्ये पेट्रोल सर्वाधिक महाग असते पण, पेट्रोलच्या कारची किंमत कमी असते. डिझेल तुलनेत स्वस्त असते पण, डिझेलवर चालणारी कार तुलनेत जास्त महाग म्हणजे किंमत ७५ हजार ते १ लाख रुपयांनी अधिक असते. या कारचा मेंटेनन्सही अधिक असतो. तुम्ही दररोज किती प्रवास करता यावर कार कुठली घ्यायची हे ठरवा. दररोज ८० किमीपेक्षा जास्त प्रवास करीत असाल तर डिझेलवर चालणारी कार विकत घ्या. या कारसाठी मोजलेले जास्तीचे पैसे दोन वर्षांत वसूल होऊ शकतात. सीएनजी हे प्रदूषणमुक्त ‌इंधन आहे पण, त्याची उपलब्धी ही समस्या ठरू शकते. सीएनजी सि‌लिंडर जागा जास्त घेतो, ही बाजूही लक्षात घ्या. 

No comments:

Post a Comment