9 February 2014

घरगुती 'अ‍ॅप्स'

मोबाइल फोनचा नवा अवतार असलेल्या स्मार्टफोननं एव्हाना वापरकर्त्यांचं जग व्यापून टाकलं आहे. कॉलिंग, ईमेल, एसएमएस, व्हॉट्सअ‍ॅप, चॅट, फेसबुक या संवाद प्रकारांसोबतच स्मार्टफोन हा अन्य कारणांसाठीही उपयुक्त ठरत आहे. मग ते रेल्वे-बसचं वेळापत्रक पाहणं असो किंवा सिनेमाचं तिकीट बुक करणं असो, गेम्स खेळणं असो की नेटबँकिंग करणं असो, दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींवर उत्तर शोधण्यासाठी स्मार्टफोन हा अतिशय चांगला जोडीदार बनत चालला आहे. स्मार्टफोनची ही उपयुक्तता केवळ नोकरदार, तरुण-तरुणी किंवा उद्योजकांपुरतीच मर्यादित राहिलेली नाही. तर चोवीस तास घरात राहून संपूर्ण कुटुंबाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या गृहिणींसाठीही स्मार्टफोन हा मार्गदर्शक मित्र बनत चालला आहे. आर्थिक नियोजनापासून ते गृहसजावटीपर्यंत अनेक गोष्टी स्मार्टफोनवरील अ‍ॅप्सच्या मदतीने सहज हाताळता येत आहेत. अशाच काही अ‍ॅप्सविषयी:
हाउझ्झ इंटेरिअर डिझाइन आयडियाज
'सीएनएन'ने 'अंतर्गत व बाह्य गृहसजावटीचा विकिपीडिया' असा गौरव केलेले हे 'अ‍ॅप' गृहसजावटीसाठी अत्यंत उपयुक्त असे अ‍ॅप्लिकेशन आहे. गुगल प्ले स्टोअर किंवा अँड्रॉइड मार्केटमधून हे मोफत डाऊनलोड करता येतं. घराची रचना, फर्निचरची मांडणी, रंगसंगती, पडद्यांचे प्रकार, प्रत्येक खोलीची विशिष्ट आखणी अशा गृहसजावटीबाबतच्या सर्व गोष्टींबाबतच्या टिप्स या अ‍ॅप्लिकेशनवर मिळतात. आकर्षक गृहसजावटीची तब्बल वीस लाख छायाचित्रेही या अ‍ॅपवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. अर्थात यापैकी अनेक छायाचित्रे मोठमोठे बंगले किंवा अपार्टमेंटच्या गृहसजावटीशी संबंधित असली तरी त्यातून आपल्या घराला शोभतील अशी रचना करणे सहज शक्य आहे.
एक्स्पेन्स मॅनेजर
फेब्रुवारी-मार्च महिना आला की सरकारी यंत्रणांपासून ते कंपन्यांपर्यंत सर्वाना वेध लागतात अर्थसंकल्पाचे. पण सर्वसामान्य गृहिणींचा अर्थसंकल्प हा रोज घडत-बिघडत असतो. येणारे उत्पन्न आणि जाणारा खर्च यांचा ताळमेळ जुळवत संसाराची गाडी व्यवस्थितपणे हाकण्याची किमया त्यांना करावी लागते. अशा वेळी एक्स्पेन्स मॅनेजर हे अ‍ॅप्लिकेशन चांगल्या मदतनीसाचे काम करते. या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या जमाखर्चाचा साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक हिशोब ठेवू शकता. दरमहा येणारे उत्पन्न आणि दैनंदिन खर्च यांची नोंद या अ‍ॅपमध्ये करावी लागते. त्यानंतर हे अ‍ॅप्लिकेशन आपल्याला वेळोवळी संपूर्ण हिशोब उपलब्ध करून देते. दुधवाला, कामवाली बाई, पेपरबिल अशा मासिक खर्चाची नोंद करण्यासाठीही येथे वेगळा 'सेक्शन' आहे. याशिवाय फोनबिल, वीजबिल, गृहकर्जाचा हप्ता यांच्या निर्धारित तारखेपूर्वी हे अ‍ॅप्लिकेशन आपल्याला पूर्वसूचना देते. अकाऊंट ट्रान्सफर, ऑटो फिल, कल्क्युलेटर, टॅक्स या गोष्टींचीही नोंद या अ‍ॅपवर करता येते.
हेल्थकार्टप्लस
औषधांच्या दुकानांमध्ये फार्मसिस्ट ठेवण्याची सक्ती झाल्यापासून दुकानदारांनी प्रीस्क्रिप्शनशिवाय औषधे देणे बंद केले आहे. तर डॉक्टरमंडळी ठरावीक कंपन्यांची महागडी औषधे लिहून देऊन रुग्णांच्या खिशाला कात्री लावतात. मात्र यापैकी कोणीही संबंधित औषधाचे उपयोग-दुरुपयोग किंवा अन्य बारीक तपशील सांगण्याच्या फंदात पडत नाही. अशा वेळी 'हेल्थकार्टप्लस' हे अ‍ॅप्लिकेशन तुमच्या घरातील औषधांचे व्यवस्थापन करण्यासाठी उपयोगी ठरते. सर्व जेनेरिक औषधांची यादी या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेल्या औषधांइतकीच प्रभावी पण स्वस्त औषधे तुम्हाला या अ‍ॅपवरून शोधता येतील. या औषधांचे गुणधर्म, त्यांतील घटक, ती घेण्यापूर्वी घ्यावयाची काळजी, पथ्य ही सर्व माहिती जोडीला उपलब्ध आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुम्ही या अ‍ॅपच्या माध्यमातून औषधे मागवूही शकता. केवळ त्यासाठी तुमच्या डॉक्टरांनी दिलेले प्रीस्क्रिप्शन तुम्हाला येथे अपलोड करावे लागते. तुमच्या विभागाचा पिनकोड नोंदवताच त्या भागात औषध उपलब्ध आहे की नाही, याची माहितीही या अ‍ॅपमधून मिळते.      -प्रतिनिधी
'स्मार्ट कुक' बना!
अन्य गृहोपयोगी गोष्टींप्रमाणेच स्वयंपाकाशी संबंधित अनेक अ‍ॅप्स अँड्रॉइडवर उपलब्ध आहेत. या अ‍ॅप्लिकेशन्सवर खाद्यपदार्थाच्या लाखो रेसिपीस, स्वयंपाकाच्या टिप्स उपलब्ध आहेत. यापैकी 'स्वीटन्स्पाइसी- इंडियन रेसिपीज', 'हिंदी रेसिपीज' आणि 'तरला दलाल रेसिपीज' ही अ‍ॅप्लिकेशन्स अतिशय चांगली आहेत. तरला दलाल हे नाव सर्वाना परिचित आहेच. टीव्हीच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या तरला दलाल यांच्या लज्जतदार रेसिपी या अ‍ॅपवरून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत या अ‍ॅपच्या वापरकर्त्यांची संख्या तीस लाखांवर पोहोचली आहे. त्याचप्रकारे स्वीटन्स्पाइसी हे अ‍ॅप्लिकेशन भारतीय पदार्थाच्या पाककृतींसाठी विशेष अ‍ॅप्लिकेशन आहे. या अ‍ॅपवर तब्बल साडेसात हजार पाककृती असून सुमारे बाराशे पाककृतींबाबतचे व्हिडीओही उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या सर्व पाककृतींची शाकाहारी-मांसाहारी, चव, बनवण्याची वेळ, घटक जिन्नस यानुसार वर्गवारी करण्यात आली आहे. त्यामुळे कोणतीही पाककृती शोधणे फार कठीण नाही. आणखी एक बाब म्हणजे, या अ‍ॅपवर गृहिणींसाठी वेगवेगळय़ा टिप्सही उपलब्ध आहेत. इंग्रजीशी फारसे सख्य नसलेल्या गृहिणींसाठी 'हिंदी रेसिपीज' हे अ‍ॅप्लिकेशन चांगला पर्याय आहे. 

No comments:

Post a Comment