5 April 2014

इंटरनेट व्यापाराला चालना!

सध्याच्या आधुनिक युगात एखाद्या वस्तूची खरेदी करण्यासाठी बाजारात जाण्याची आवश्यकताही लागत नाही. इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला हवी ती वस्तू घरबसल्या मागवता येते. अगदी पेनड्राइव्हपासून टीव्ही, फ्रिजपर्यंत आणि कपडय़ांपासून दागिन्यांपर्यंत असंख्य वस्तू ई-बाजारात उपलब्ध असतात. आपण फक्त मागणी करायची, त्या वस्तू घरपोच आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. भारतात तर इंटरनेट वापरकर्त्यांकडून नेहमीच ई-खरेदी केली जात असून, त्यामुळे ई-बाजार भरभराटीला आला आहे.

भारतामध्ये 'फ्लिपकार्ट'www.flipkart.com, 'ईबे इंडिया'www.ebay.in, 'शॉपक्लूज.कॉम'www.shopclues.com, 'म्यानत्रा'www.myntra.com, 'होमशॉप १८'www.homeshop18.com,'येभी'www.yebhi.com,'स्नॅपडील'www.snapdeal.com यांसारखी अनेक संकेतस्थळे आहेत, ज्यांवर ई-व्यापार चालतो. यातील आघाडीचे ई-व्यापार संकेतस्थळ असलेल्या 'ईबे इंडिया'ने नुकताच आपला 'कॉमर्स ३.०' हा अहवाल प्रकाशित केला. इंटरनेटवरील व्यापाराचे महत्त्व आणि त्याचे फायदे सांगणे हा या अहवालाचा उद्देश आहे. भारतातील विविध व्यापाऱ्यांना इंटरनेटच्या माध्यामातून जोडणे आणि ग्राहकांना विविध वस्तू उपलब्ध करून देणे हाही महत्त्वाचा उद्देश ईबेचा आहे. ऑनलाइनच्या माध्यमातून भारतातले उद्योजक कशा प्रकारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार करत आहेत आणि त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला कशा प्रकारे चालना मिळत आहे, हे सांगण्याचा प्रयत्न या अहवालाने केला आहे. व्यापाराच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा ई-व्यापार किती सोयीस्कर आणि प्रभावशाली आहे, याची माहितीही या अहवालात आहे. भारतात ई-व्यापार वाढावा, त्याची भरभराट व्हावी यासाठी अनेक संकेतस्थळे प्रयत्न करत आहेत. भारतातील व्यापारी आणि ग्राहकांच्या खरेदी-विक्रीच्या पद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी नव्या युगातले हे तंत्रज्ञान कारणीभूत ठरत आहेत. भारतात ई-व्यापार रुजवण्यासाठी अनेक अनेक संकेतस्थळे प्रयत्नशील आहेत, मात्र त्यात 'ईबे'चे योगदान महत्त्वाचे आहे. ''भारतीय ई-व्यापार क्षेत्राची भरभराटी व्हावी, यासाठी ईबे सर्व उद्योजकांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्री स्तरावर समान संधी उपलब्ध करून देत आहे. या अहवालाच्या माध्यमातून भारतातील लघू आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योजकांना ई-व्यापारामुळे तुमचा कसा फायदा होऊ शकतो आणि येथे कशा प्रकारे मुबलक संधी आहे, याची झलक दाखवू इच्छितो,'' असे 'ईबे'च्या वतीने सांगण्यात आले आहे. एखाद्या उद्योगाला वा व्यापाराला जागतिक ग्राहक मिळवून देण्यासाठी उद्योजकाला बरेच प्रयत्न करावे लागतात. वस्तूची निर्यात करणे, परदेशी बाजारपेठांमध्ये वस्तू विकण्यास आणणे, तेथील ग्राहक मिळवणे, मार्केटिंग अशा अनेक माध्यमांतून त्या वस्तूची अनेक देशांमध्ये विक्री केली जाते. मात्र इंटरनेटच्या माध्यमातून जर वस्तूची विक्री केल्यास जगभरातील ग्राहक सहज मिळू शकतात. सध्या रिटेल क्षेत्रात एफडीआय आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. एफडीआयमुळे जगभरातील विविध कंपन्यांना जागतिक ग्राहक लाभणार. मात्र ई-व्यापारामुळे सहजतेने अनेक कंपन्यांच्या वस्तूंना जागतिक ग्राहक मिळत आहेत. त्यामुळेच 'ईबे इंडिया'ने एक पाऊल पुढे टाकत व्यापारी वर्गाला आधुनिक बनवण्यासाठी आणि नवनवीन गोष्टींची माहिती देण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. भारतातील विविध व्यापाऱ्यांना त्यामुळे जगभरातील ग्राहक मिळतील, याच उद्देशाने ईबे इंडिया देशभरातील असंख्य लघू आणि मध्यम उद्योजकांना मदत करणार आहे.


ई-व्यापाराचे फायदे
* ईबेच्या विक्रेत्यांना सर्वसाधारणपणे जगभरातील ३१ बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळतो. वस्तूविक्रीची पारंपरिक पद्धत अवलंबणाऱ्या विक्रेत्यांना वस्तूच्या विक्रीतून १० टक्के नफा मिळतो. मात्र ई-व्यापार करणाऱ्यांना ९८ टक्के नफा मिळतो. ई-व्यापार करणाऱ्यांना अंतराच्या मर्यादा नसतात. पारंपरिक व्यापार करणाऱ्यांना बाजारपेठांमध्ये जाऊन वस्तू विक्रीस उपलब्ध करून द्यावी लागते. ई-व्यापार करणाऱ्यांनी एकदाच इंटरनेटवर वस्तू उपलब्ध केल्यास जगभरातील ग्राहकांना त्याची माहिती मिळू शकते. ब्रिटन, अमेरिका व ऑस्ट्रेलिया या देशांशी ईबेवरून भारताचा व्यापार होत आहे. ऑस्ट्रेलिया व रशिया या देशांशी अधिक व्यापार करण्याची संधी भारताला इंटरनेटवरून मिळते.
* ई-व्यापारामुळे लघू उद्योजकांना समान संधी उपलब्ध होत आहेत. ई-व्यापारात मोठय़ा कंपन्यांचे वर्चस्व कमी असते आणि नव्या कंपन्यांचा एकंदर विक्रीत मोठा वाटा असतो. ई-व्यापारामध्ये प्रवेश करण्यासाठी कमी अडथळे असल्याने नव्या कंपन्या तिथे सहज उपलब्ध होतात. त्याचा फायदा 'ईबे'ला नेहमीच झाला आहे. त्यामुळे त्यांनी नव्या व्यापाऱ्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
* ई-व्यापारामुळे राष्ट्रीय व्यापाराला चालना मिळते. दूरवरच्या ग्राहक आणि विक्रेत्यांना एकत्र आणण्याचे काम ई-व्यापार करतात. ईबे इंडियावरचे देशांतर्गत व्यापारी १९ राज्यांमध्ये पसरलेले आहे. दिल्ली व महाराष्ट्रात सर्वाधिक ई-विक्रेते आहेत, तर केरळ, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये सर्वाधिक ई-ग्राहक आहेत.
* इंटरनेटवर उच्च दर्जाच्या स्पध्रेमुळे किमती कमी असतात. त्याचा फायदा ग्राहकांनाच होतो. अनेकविध उत्पादनांची उपलब्धतता असल्याने ग्राहकांना पायपीट करावी लागत नाही. केवळ माऊसच्या आधारे 'क्लिकक्लिकाट' करण्याची गरज असते. ज्या वस्तू विकल्या जात नाहीत, त्याही विक्रीयोग्य बनतात, याचा फायदा विक्रेत्यांसह ग्राहकांनाही होतो. जगभरातील 
सर्व व्यापार इंटरनेटवर आले, 
तर त्याचा फायदा सर्वानाच होणार आहे.
ई-व्यापार वाढवण्यासाठी आवश्यकता
* ई-व्यापाराची क्षमता अद्याप आपल्या लक्षात आलेली नाही. ई-व्यापाराच्या वृद्धीसाठी योजनात्मक आणि विचारात्मक पावले उचलणे आवश्यक आहे. सध्या या क्षेत्रात अनेक बंधने आणि मर्यादा आहेत. या मर्यादा पार करणे आवश्यक आहे. ई-व्यापारवृद्धीसाठी खालील गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. ' रोखीचा वापर कमी करणाऱ्या अर्थव्यवस्थेला चालना ' सीमाशुल्क प्रक्रियेचे सुलभीकरण ' चांगली इंटरनेट कनेक्टिव्हिटी ' ट्रेडमार्कच्या जाचक नियमांचे शिथिलीकरण ' विक्रेत्यांसाठी वाहतुकीच्या दरात कपात करणे.

मोबाइलची सुरक्षा

स्मार्ट फोनचा वापर करणाऱ्यांची संख्या ज्या प्रमाणात वाढतेय त्या प्रमाणात स्मार्ट फोनची यंत्रणा बिघडवण्यासाठी अनेक व्हायरसेसही बाजारात येऊ लागले आहेत. हे व्हायरसेस आपल्या फोनची खूप हानी करू शकतात. यामुळे यांच्यापासून जपून राहणे हे आपल्याला केव्हाही चांगले. विशेषत: एकमेकांकडून माहितीची देवाण-घेवाण करताना, वाय-फाय नेटवर्कचा वापर करताना हा व्हायरसचा धोका अधिक असतो. यामुळे मोबाइलची काळजी घेणे हे महत्त्वाचे झाले आहे. मोबाइलमध्ये कोणते अ‍ॅण्टीव्हायरस तुम्ही टाकू शकता याची माहिती आपण जाणून घेऊ या.
कॅस्पर्सस्काय
हा अ‍ॅण्टीव्हायरस कॉम्प्युटरसाठी तर प्रसिद्ध आहेच पण मोबाइलसाठीही तितकाच उपयोगी आहे. 'कॅस्पर्सस्काय मोबाइल सिक्युरिटी १४' हे त्याचं लेटेस्ट व्हर्जन आहे. हा अ‍ॅण्टीव्हायरस तुमच्या स्मार्ट फोनची फोन मेमरी, मेमरी कार्ड पूर्णपणे स्कॅन करतो. मालवेअर्स, व्हायरस फाइल डिलीट करण्यास मदत करतो. यामुळे तुमच्या स्मार्ट फोनमधील डेटा व्हायरसपासून सुरक्षित राहतो. या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला ब्लॅकलिस्टची सुविधा उपलब्ध आहे ज्यामुळे तुम्ही नको असलेल्या नंबरवरून येणारे कॉल्स आणि एसएमएस ब्लॉक करू शकता.
प्रायव्हेट प्रोटेक्शन हे कॅस्पर्सस्काय मोबाइल सिक्युरिटी १४ मधील प्रमुख वैशिष्टय़. यामुळे तुम्हाला हवे असलेले कॉन्टॅक्ट्स, एसएमएस, कॉल लॉग्स इतरांपासून लपवू शकता. या अ‍ॅण्टीव्हायरसमधील थेट प्रोटेक्शनमुळे तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला तरी एका एसएमएसद्वारे तुम्हाला त्यात नव्याने घातलेल्या सिम कार्डची माहिती मिळू शकते. गुगल मॅप्स आणि जीपीएसच्या माध्यमातून तुम्ही चोरीला गेलेल्या फोनचं लोकेशन शोधू शकता. ३० दिवसांचे ट्रायल व्हर्जन संपल्यावर तारीख बदलून हे सॉफ्टवेअर वापरू नका त्यामुळे तुमच्या स्मार्टफोनची ऑपरेटिंग सिस्टम क्रॅश होऊ शकते. ट्रायल व्हर्जननंतर हे सॉफ्टवेअर वापरायचे असेल तर वर्षभराचे लायसन्स व्हर्जन घेणंच बरं. कॅस्पर्सस्काय मोबाइल सिक्युरिटी हा अ‍ॅण्टी व्हायरस अ‍ॅण्ड्रॉइड, विंडोज स्मार्ट फोन्ससाठी उपलब्ध आहे.
ईएसईटी
तुमचा स्मार्ट फोन व्हायरस, स्पॅम, फायरवॉल यांपासून सुरक्षित ठेवण्याचे काम ईएसईटी करतो. यामध्ये फायरवॉल प्रोटेक्शन, स्पॅम फिल्टर, अ‍ॅण्टी थेफ्ट असे फिचर्स आहेत. विंडोज आणि सिम्बियन फोन्ससाठी तो जास्त चांगला आहे. त्यात ब्लॅकलिस्ट व व्हाइट लिस्ट असे ऑप्शन आहेत. ब्लॅकलिस्टमध्ये नको असलेल्या नंबर्सचे कॉल्स किंवा मेसेजेस ब्लॉक करता येतात. व्हाइट लिस्टमध्ये तुम्ही विश्वासातील माणसांचे कॉन्टॅक्ट्स अ‍ॅड करू शकता.त्यामुळे फोन चोरीला गेला किंवा त्यातील सिमकार्ड बदलल्यास, लोकेशनसहित सर्व डिटेल्स व्हाइट लिस्टमधील नंबर्सवर एसएमएसद्वारे मिळतात. यामध्ये इनबिल्ट टास्कमॅनेजर आहे ज्यामध्ये तुम्ही रिनग अ‍ॅप्स, फोनमधील फ्री स्पेस, फोनची बॅटरी लाइफ इ. गोष्टी पाहू शकता. हा डिव्हाईस तुम्हाला पासवर्ड प्रोटेक्टेड ठेवता येतो. यामुळे तुम्ही सिक्युर वेब ब्राऊिझग करू शकता. डाऊनलोडिंगमध्ये संशयास्पद फाइल्स दिसल्या तर हा अ‍ॅण्टीव्हायरस लगेचच त्या डिलीट करतो. या फोनचे ट्रायल व्हर्जन ३० दिवसांचे असते. त्यानंतर वापरायचे असल्यास लायसन्स व्हर्जन तुम्हाला विकत घ्यावे लागेल. तुमचा चोरलेला किंवा हरवलेला डिव्हाईस शोधण्याच्या बाबतीत मात्र या अ‍ॅण्टीव्हायरसला काही मर्यादा येतात.
वेबरूट
सध्या चलती असलेल्या अ‍ॅण्ड्रॉइड स्मार्ट फोन्ससाठी हे वेबरूट मोबाइल सिक्युरिटी अ‍ॅण्टीव्हायरस सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. इन बिल्ट अ‍ॅप्लिकेशन स्कॅनर हे याचं खास वैशिष्टय़. अ‍ॅण्ड्रॉइड स्मार्ट फोनमध्ये डाऊनलोड केल्या जाणाऱ्या अ‍ॅप्समधून येणाऱ्या धोकादायक व्हायरस आणि मालवेअर्स फाइल्स हा डिलीट करतो. इन बिल्ट अ‍ॅप्स स्कॅनरमुळे तुम्ही थर्ड पार्टी सॉफ्टवेअर्स डाऊनलोड केले तरी ते ऑटोमॅटिकली स्कॅन होतात. एखाद्या अ‍ॅप्लिकेशनमध्ये व्हायरस फाइल असल्यास वेबरूट त्याचं इन्स्टॉलेशन रिजेक्ट करतो. त्यामार्फत येणाऱ्या फाइल्स ब्लॉक करतो. कॉल आणि एसएमएस ब्लॉकिंगची सुविधाही यामध्ये आहे. सिक्युअर वेब ब्राऊझिंग हे वेबरूटमधील महत्त्वाचे वैशिष्टय़. ज्यामध्ये तुम्ही वेब पेज ओपन केल्यावर वेब लिंक्स, यूआरएल लिंक्स धोकादायक असतील तर ते वेबपेज आधीच ब्लॉक होतं. वेबरूटच्या पेड व्हर्जनमध्ये तुम्हाला डिव्हाईस लॉक, वाईप डेटा, डिव्हाईस स्कीम, या फीचर्सचा अनुभव घेता येईल. जर तुमचा फोन कोणी चोरला तर डिव्हाईस लॉकमुळे सिम कार्ड बदलल्यावर आपोआपच तुमचा फोन लॉक होईल. वाईप डेटामध्ये तुमच्या चोरीला गेलेल्या या फोनमधली पर्सनल माहिती ऑॅनलाइन डिलीट करू शकता. डिव्हाईस स्कीम अलर्ट इनेबल असेल तर तुमचा फोन चोरीला गेला किंवा हरवल्यास गुगल मॅप्सच्या साहाय्याने वेबरूट तुमच्या फोनची लोकेशन सर्च करू शकतो. हा अ‍ॅण्टी व्हायरस अ‍ॅण्ड्रॉइड स्मार्ट फोन्ससाठी बेस्ट आहे परंतु तो इतर कोणत्याच स्मार्ट फोन्ससाठी उपलब्ध नाही.
नेटक्वीन मोबाइल सिक्युरिटी
मोबाइलसाठी वापरला जाणारा हा प्रचलित अ‍ॅण्टीव्हायरस आहे. तुमचा पूर्ण फोन जलद स्कॅन करण्यास हा मदत करतो. ऑटोमॅटिकली व्हायरस डेटाबेस अपडेट करणे, लॉस्ट फोन लोकेशन, प्रायव्हसी प्रोटेक्शन, ट्रॅफिक मॅनेजर, सिस्टम ऑप्टिमायझर, कॉन्टॅक्टस् बॅक अप ही या मोबाइल सिक्युरिटीची वैशिष्टय़ं आहेत. सध्या यामध्ये नेटक्वीन मोबाइल सिक्युरिटी ७.६ हे लेटेस्ट व्हर्जन आहे. स्मार्ट फोनमध्ये व्हायरस, मालवेअर्स, फोन हॅकर्सपासून तुमचा डाटा सेफ ठेवण्याचे काम हा करतो. त्यातील ट्रॅफिक मॅनेजरमुळे तुम्हाला महिन्याभरात वापरलेल्या डेटाचे प्रमाण कळू शकते, तो हॅकर्सना ब्लॉक करतो. प्रायव्हसी प्रोटेक्शन, फोन लोकेटर, सिक्युअर डेटा ब्राऊिझग हे फीचर्सदेखील नेटक्वीनमध्ये आहेत. तुम्ही कॉन्टॅक्टस्चा एस डी कार्ड वर बॅकअप घेऊ शकता. यामधील अ‍ॅन्टीलॉस्ट फिचरमध्ये साऊंड अलार्मची सुविधाही उपलब्ध आहे. तसंच हे फीचर तुमच्या हरवलेल्या फोनची लोकेशन सुद्धा ट्रेस करू शकते. अगदी सहजरीत्या वापरता येण्यासारखे हे सॉफ्टवेअर आहे. याचं ट्रायल व्हर्जन ३० दिवसांचे असते त्यानंतर तुम्हाला ते रजिस्टर करावे लागते. पण यामध्ये ऑनलाइन डेटा बॅकअप घेण्याची सुविधा नाही. अ‍ॅण्ड्रॉइड, िवडोज, सिम्बियन, ब्लॅकबेरी स्मार्ट फोन्समध्ये हे सॉफ्टवेअर सपोर्टेबल आहे.
अवास्त
अवास्त ही अ‍ॅण्टीव्हायरसची चांगली कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीचाही मोबाइल अ‍ॅण्टीव्हायरस असून यामध्ये आपण विविध प्रकरची माहिती स्कॅन करू शकतो. यामध्ये आपल्याला व्हायरस स्कॅनर, प्रायव्हसी अ‍ॅडव्हायजर, अ‍ॅप्लिकेशन मॅनेजमेंट, शील्ड कंट्रोल, एसएमएस अँड कॉल फिल्टर, फायरवॉल, नेटवर्क मीटर अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत. यामध्ये आपण एखादी साइट ब्लॉक करण्यापासून अनेक सुरक्षेच्या गोष्टी पूर्ण करून ठेवू शकतो. आपण माहितीची देवाण-घेवाण करताना कोणत्याही प्रकारचा व्हायरस त्यामध्ये असेल तर आपल्याला हा अ‍ॅण्टीव्हायरस वेळीच सूचित करतो. मग आपण ती माहिती घ्यायची की नाही हा आपला प्रश्न असतो. इतकेच नव्हे तर ती माहिती स्कॅन करण्याची सुविधाही यामध्ये आहे. यामुळे आपण आलेली माहिती स्कॅनिंग करून घेऊन त्यातील व्हायरस काढून टाकला जातो.
मॅकेफी
अ‍ॅण्टी व्हायरससाठी प्रसिद्ध असलेल्या कंपन्यांमध्ये 'मॅकेफी'चा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. स्मार्ट फोनमध्ये व्हायरस, स्पायवेअर्स, मालवेअर्सपासून तुमचा डेटा प्रोटेक्ट करण्याचे काम मॅकेफी करतो. 'साईट अ‍ॅडवायजर' हे यातील महत्त्वाचं वैशिष्टय़ं. ज्यामुळे तुम्ही सुरक्षितरीत्या नेट सर्फिग आणि ऑॅनलाइन शॉिपग करू शकता. तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला तर हा अ‍ॅण्टीव्हायरस तुमचा डेटा प्रोटेक्ट करतो. यामधील सेफगार्डमुळे स्पायवेअर्स, मालवेअर्सपासून तुमचा फोन सुरक्षित राहतो. तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला तरी गुगल मॅप्स आणि जीपीएसच्या साहाय्याने मॅकेफी तुमच्या डिव्हाइसची लोकेशन ट्रेस करू शकतो तसंच त्यातील बदललेल्या सिम आणि त्यामधून केल्या जाणाऱ्या कॉल्सची माहिती देऊ शकते. याच्या साहाय्याने तुम्ही हवा तिथे डेटा बॅकअप घेऊन कुठेही अ‍ॅक्सेस करू शकता तसेच तुमचा फोन चोरीला गेला किंवा हरवला तर त्यावरील डेटा तुम्ही नवीन फोनवर रिस्टोअर करू शकता. हा अ‍ॅण्टीव्हायरस सोशल नेटवर्किंग साइट्स, ईमेल, एसएमएस, एमएमएसमधून येणाऱ्या धोकादायक लिंक ब्लॉक करतो. याचे ट्रायल व्हर्जन सात दिवसांचे असते. त्यानंतर जर तुम्हाला तो वापरायचा असेल तर लायसन्स व्हर्जन विकत घ्यावं लागेल. काही वेळा या अ‍ॅण्टीव्हायरसमुळे तुमचा स्मार्टफोन थोडा स्लो होतो. अ‍ॅण्ड्रॉइड, विंडोज, सिम्बियन, ब्लॅकबेरी स्मार्ट फोन्ससाठी तुम्ही तो वापरू शकता.