5 April 2014

स्वस्त आणि मस्त

स्मार्टफोनच्या स्पर्धेतून जन्माला आलेल्या टॅब्लेटने हळूहळू मोबाइलसोबतच कम्प्युटरची बाजारपेठही गिळायला सुरुवात केली आहे. स्मार्टफोनपेक्षा अधिक स्मार्ट आणि कम्प्युटर किंवा लॅपटॉपपेक्षा जरासा कमी अशा मधल्या पातळीवर असलेले टॅब्लेट सध्या शेकडोंनी विकले जात आहेत. ऑफिस, ई मेल, मोठी स्क्रीन, मल्टी टास्किंग यांमुळे टॅब्लेटना 'मिनी लॅपटॉप' समजले जाते. पण तरीही डेस्कटॉप, लॅपटॉप किंवा नोटबुक पीसीच्या तुलनेत ते बरेच पिछाडीवर आहेत. त्यामुळे लॅपटॉपची बाजारामधील नवलाई अजूनही शाबूत आहे. त्यातच आता कमी वजनाचे, त्यातल्या त्यात कमी आकाराचे आणि कमी जाडीचे लॅपटॉप बनवण्याकडे सर्वच कंपन्यांचा कल राहिला आहे. असे असले तरी, किंमत हा अडसर आहेच. उत्तम प्रोसेसिंग स्पीड, जास्त मेमरी किंवा दर्जेदार अतिरिक्त वैशिष्टय़े असलेले लॅपटॉप ४०-५० हजारांच्या पुढेच उपलब्ध आहेत. तरीही सध्या काही असेही लॅपटॉप आहेत, जे ४० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचे असूनही त्यामध्ये दर्जेदार वैशिष्टय़े पाहायला मिळतात. सर्वसामान्यांना परवडतील, अशा दरांत उपलब्ध असलेल्या लॅपटॉपवर एक दृष्टिक्षेप :
एसर अ‍ॅस्पायर व्ही ५-४३१
स्वस्तातला किंवा तुलनेने कमी किमतीचा लॅपटॉप म्हटलं की त्यातील स्पेसिफिकेशन्सशी तडजोड करावी लागतेच; पण त्याचबरोबर त्याचा 'लुक'ही सर्वसाधारण किंवा ढोबळ असतो. त्यामुळे बाजारात कमी किमतीत उपलब्ध असलेले ब्रॅण्डेड कंपन्यांचे लॅपटॉप ग्राहकांच्या पसंतीस उतरत नाहीत. पण एसरचा अ‍ॅस्पायर व्ही ५-४३१ याबाबतीत निश्चितच ग्राहकांचे समाधान करू शकतो. कमी वजन असलेला, प्रवासात किंवा कार्यालयात कुठेही व्यवस्थित हाताळता येऊ शकणारा, इंटरनेटच्या नियमित वापरासाठी किंवा मूव्हीज पाहण्यासाठी तुम्हाला लॅपटॉप हवा असेल, तर हा एक चांगला पर्याय आहे. यामधील १.५ गिगाहर्ट्झचा सॅण्डी ब्रिज इन्टेल पेंटियम ९८७ प्रोसेसर हा कमी क्षमतेचा प्रोसेसर आहे. मात्र, या सोबतच इन्टेल एचडी ग्राफिक्स कार्ड, दोन जीबी रॅम आणि ५०० जीबीची हार्डडिस्कही पुरवण्यात आली आहे. विंडोज ७ होम बेसिक (६४ बिट) ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या या लॅपटॉपमध्ये ब्लूटूथ आणि वायफायची सुविधा पुरवण्यात आली आहे. मात्र, या दोघांसाठी स्वतंत्र इंडिकेटर्स नसल्याने किंचित गैरसोय होते. कीबोर्डचा आकार मोठा असला तरी त्यासाठी स्वतंत्र न्युमरिक कीपॅडचा बळी देण्यात आला आहे. लॅपटॉपची स्क्रीन १४ इंच आकाराची आहे. 
किंमत २५,५०० रुपयांपर्यंत.

No comments:

Post a Comment