5 April 2014

इंटरनेट व्यापाराला चालना!

सध्याच्या आधुनिक युगात एखाद्या वस्तूची खरेदी करण्यासाठी बाजारात जाण्याची आवश्यकताही लागत नाही. इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला हवी ती वस्तू घरबसल्या मागवता येते. अगदी पेनड्राइव्हपासून टीव्ही, फ्रिजपर्यंत आणि कपडय़ांपासून दागिन्यांपर्यंत असंख्य वस्तू ई-बाजारात उपलब्ध असतात. आपण फक्त मागणी करायची, त्या वस्तू घरपोच आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. भारतात तर इंटरनेट वापरकर्त्यांकडून नेहमीच ई-खरेदी केली जात असून, त्यामुळे ई-बाजार भरभराटीला आला आहे.

भारतामध्ये 'फ्लिपकार्ट'www.flipkart.com, 'ईबे इंडिया'www.ebay.in, 'शॉपक्लूज.कॉम'www.shopclues.com, 'म्यानत्रा'www.myntra.com, 'होमशॉप १८'www.homeshop18.com,'येभी'www.yebhi.com,'स्नॅपडील'www.snapdeal.com यांसारखी अनेक संकेतस्थळे आहेत, ज्यांवर ई-व्यापार चालतो. यातील आघाडीचे ई-व्यापार संकेतस्थळ असलेल्या 'ईबे इंडिया'ने नुकताच आपला 'कॉमर्स ३.०' हा अहवाल प्रकाशित केला. इंटरनेटवरील व्यापाराचे महत्त्व आणि त्याचे फायदे सांगणे हा या अहवालाचा उद्देश आहे. भारतातील विविध व्यापाऱ्यांना इंटरनेटच्या माध्यामातून जोडणे आणि ग्राहकांना विविध वस्तू उपलब्ध करून देणे हाही महत्त्वाचा उद्देश ईबेचा आहे. ऑनलाइनच्या माध्यमातून भारतातले उद्योजक कशा प्रकारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार करत आहेत आणि त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला कशा प्रकारे चालना मिळत आहे, हे सांगण्याचा प्रयत्न या अहवालाने केला आहे. व्यापाराच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा ई-व्यापार किती सोयीस्कर आणि प्रभावशाली आहे, याची माहितीही या अहवालात आहे. भारतात ई-व्यापार वाढावा, त्याची भरभराट व्हावी यासाठी अनेक संकेतस्थळे प्रयत्न करत आहेत. भारतातील व्यापारी आणि ग्राहकांच्या खरेदी-विक्रीच्या पद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी नव्या युगातले हे तंत्रज्ञान कारणीभूत ठरत आहेत. भारतात ई-व्यापार रुजवण्यासाठी अनेक अनेक संकेतस्थळे प्रयत्नशील आहेत, मात्र त्यात 'ईबे'चे योगदान महत्त्वाचे आहे. ''भारतीय ई-व्यापार क्षेत्राची भरभराटी व्हावी, यासाठी ईबे सर्व उद्योजकांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्री स्तरावर समान संधी उपलब्ध करून देत आहे. या अहवालाच्या माध्यमातून भारतातील लघू आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योजकांना ई-व्यापारामुळे तुमचा कसा फायदा होऊ शकतो आणि येथे कशा प्रकारे मुबलक संधी आहे, याची झलक दाखवू इच्छितो,'' असे 'ईबे'च्या वतीने सांगण्यात आले आहे. एखाद्या उद्योगाला वा व्यापाराला जागतिक ग्राहक मिळवून देण्यासाठी उद्योजकाला बरेच प्रयत्न करावे लागतात. वस्तूची निर्यात करणे, परदेशी बाजारपेठांमध्ये वस्तू विकण्यास आणणे, तेथील ग्राहक मिळवणे, मार्केटिंग अशा अनेक माध्यमांतून त्या वस्तूची अनेक देशांमध्ये विक्री केली जाते. मात्र इंटरनेटच्या माध्यमातून जर वस्तूची विक्री केल्यास जगभरातील ग्राहक सहज मिळू शकतात. सध्या रिटेल क्षेत्रात एफडीआय आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. एफडीआयमुळे जगभरातील विविध कंपन्यांना जागतिक ग्राहक लाभणार. मात्र ई-व्यापारामुळे सहजतेने अनेक कंपन्यांच्या वस्तूंना जागतिक ग्राहक मिळत आहेत. त्यामुळेच 'ईबे इंडिया'ने एक पाऊल पुढे टाकत व्यापारी वर्गाला आधुनिक बनवण्यासाठी आणि नवनवीन गोष्टींची माहिती देण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. भारतातील विविध व्यापाऱ्यांना त्यामुळे जगभरातील ग्राहक मिळतील, याच उद्देशाने ईबे इंडिया देशभरातील असंख्य लघू आणि मध्यम उद्योजकांना मदत करणार आहे.


ई-व्यापाराचे फायदे
* ईबेच्या विक्रेत्यांना सर्वसाधारणपणे जगभरातील ३१ बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळतो. वस्तूविक्रीची पारंपरिक पद्धत अवलंबणाऱ्या विक्रेत्यांना वस्तूच्या विक्रीतून १० टक्के नफा मिळतो. मात्र ई-व्यापार करणाऱ्यांना ९८ टक्के नफा मिळतो. ई-व्यापार करणाऱ्यांना अंतराच्या मर्यादा नसतात. पारंपरिक व्यापार करणाऱ्यांना बाजारपेठांमध्ये जाऊन वस्तू विक्रीस उपलब्ध करून द्यावी लागते. ई-व्यापार करणाऱ्यांनी एकदाच इंटरनेटवर वस्तू उपलब्ध केल्यास जगभरातील ग्राहकांना त्याची माहिती मिळू शकते. ब्रिटन, अमेरिका व ऑस्ट्रेलिया या देशांशी ईबेवरून भारताचा व्यापार होत आहे. ऑस्ट्रेलिया व रशिया या देशांशी अधिक व्यापार करण्याची संधी भारताला इंटरनेटवरून मिळते.
* ई-व्यापारामुळे लघू उद्योजकांना समान संधी उपलब्ध होत आहेत. ई-व्यापारात मोठय़ा कंपन्यांचे वर्चस्व कमी असते आणि नव्या कंपन्यांचा एकंदर विक्रीत मोठा वाटा असतो. ई-व्यापारामध्ये प्रवेश करण्यासाठी कमी अडथळे असल्याने नव्या कंपन्या तिथे सहज उपलब्ध होतात. त्याचा फायदा 'ईबे'ला नेहमीच झाला आहे. त्यामुळे त्यांनी नव्या व्यापाऱ्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
* ई-व्यापारामुळे राष्ट्रीय व्यापाराला चालना मिळते. दूरवरच्या ग्राहक आणि विक्रेत्यांना एकत्र आणण्याचे काम ई-व्यापार करतात. ईबे इंडियावरचे देशांतर्गत व्यापारी १९ राज्यांमध्ये पसरलेले आहे. दिल्ली व महाराष्ट्रात सर्वाधिक ई-विक्रेते आहेत, तर केरळ, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये सर्वाधिक ई-ग्राहक आहेत.
* इंटरनेटवर उच्च दर्जाच्या स्पध्रेमुळे किमती कमी असतात. त्याचा फायदा ग्राहकांनाच होतो. अनेकविध उत्पादनांची उपलब्धतता असल्याने ग्राहकांना पायपीट करावी लागत नाही. केवळ माऊसच्या आधारे 'क्लिकक्लिकाट' करण्याची गरज असते. ज्या वस्तू विकल्या जात नाहीत, त्याही विक्रीयोग्य बनतात, याचा फायदा विक्रेत्यांसह ग्राहकांनाही होतो. जगभरातील 
सर्व व्यापार इंटरनेटवर आले, 
तर त्याचा फायदा सर्वानाच होणार आहे.
ई-व्यापार वाढवण्यासाठी आवश्यकता
* ई-व्यापाराची क्षमता अद्याप आपल्या लक्षात आलेली नाही. ई-व्यापाराच्या वृद्धीसाठी योजनात्मक आणि विचारात्मक पावले उचलणे आवश्यक आहे. सध्या या क्षेत्रात अनेक बंधने आणि मर्यादा आहेत. या मर्यादा पार करणे आवश्यक आहे. ई-व्यापारवृद्धीसाठी खालील गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. ' रोखीचा वापर कमी करणाऱ्या अर्थव्यवस्थेला चालना ' सीमाशुल्क प्रक्रियेचे सुलभीकरण ' चांगली इंटरनेट कनेक्टिव्हिटी ' ट्रेडमार्कच्या जाचक नियमांचे शिथिलीकरण ' विक्रेत्यांसाठी वाहतुकीच्या दरात कपात करणे.

No comments:

Post a Comment