3 December 2013

गुगल चा मराठी शोध, मराठी गुगल

गुगलच्या सर्च इंजिन मध्ये एखादा मराठी शब्ध शोधायला गेलात, तर एक मोठी अडचण निर्माण होते. हिंदी आणि मराठी भाषेची लिपी सारखीच असल्याने, म्हणजेच देवनागरी असल्याने, अनेकवेळा या दोन्ही भाषेतील शोध परिणाम ऐकमेकात मिसळून जातात. आणि या शोध परिणामात हिंदी भाषेचाच प्रभाव दिसून येतो. मराठी सर्च रिझल्ट्स लांब खाली टाकले जातात. उदाहरणार्थ दोन्ही भाषेत असलेला ‘गीत’ हा शब्द इंग्रजी गुगल मध्ये सर्च करुन पहा. अशावेळी मग आपल्याला फक्त १००% (खरं तर ९९% गृहीत धरायला हरकत नाही! १% इकडे तिकडे!) मराठी भाषेत शोध परिणाम हवे असतील, फक्त मराठी भाषेतील इंटरनेटचा शोध घ्यायचा असेल, जालावर शुद्ध मोकळ्या मराठी वातावरणात वावरायचे असेल, तर काय करता येईल? हा प्रश्न मला काल परवा पर्यंत पडला होता, पण आता गुगल मध्येच मला माझ्या या प्रश्नाचे उत्तर देखील सापडलं आहे.

त्यासाठी आपल्याला विशेष असं काही करावं लागणार नाही.

१. नेहमीप्रमाणे इंग्रजी गुगल वर जा.
२. सर्च बॉक्सच्या खाली दिलेल्या मेनूबार मधून मराठी भाषेची निवड करा.
इंग्रजी गुगल, इंग्लिश गुगल
मराठी गुगल
३. आपल्याला मराठी भाषेतील गुगल दिसू लागलं आहे.
की पॅड आणि भाषा साधने
४. सर्च बॉक्सच्या उजव्या कोपर्‍यावर जरा नजर टाका. तिथे की-पॅड च्या चित्राचे एक छोटेसे बटण आपल्याला दिसून येईल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर एक की-पॅड उघडला जाईल, त्याचा उपयोग करुन तुम्ही मराठी टाईप करु शकता. किंवा सोप्या पद्धतीने मराठी लिहिता येण्यासाठी आपला ‘बरह’ वरचा लेख वाचा. अथवा आपल्या मोफत ई-वाचनालय मधील ‘इंटरनेटवर मराठी टायपिंग’ या मोफत ई-पुस्तकाचा लाभ घ्या. ते इथेच ऑनलाईन वाचा अथवा आपल्या संगणकावर डाऊनलोड करुन घ्या.
५. आता आपल्याला मराठी टाईप करता येतं, असं गृहीत धरायला हरकत नाही. थोडीसा सराव करा आणि मग तुम्हाला मराठी टायपिंग अगदी सहज जमू लागेल. गुगल सर्च बॉक्स मध्ये तुम्ही मराठी देवनागरीतून शोध घेतलात, तरच तुम्हाला मराठी देवनागरी परिणाम प्राप्त होतील. म्हणूनच मराठी टाईप करता येणं हे अत्यंत गरजेचं आहे. उदा. ‘मराठी भावगीत’. तर हे तुम्हाला स्वतःला टाईप करता यायला हवं.
६. गुगल कोणकोणत्या भाषेत उपलब्ध आहे!? तर आपण की-पॅड चे जे बटण पाहिले होते, ज्यावर क्लिक केल्यानंतर की-पॅड उघडला गेला, त्याच्या शेजारीच ‘भाषा साधने’ नावाचा एक पर्याय आहे. त्यावर क्लिक करा. आणि मग आपल्यला गुगल कोणकोणत्या भाषेत उपलब्ध आहे!? ते दिसेल! 
७. मराठी भाषेतील गुगल वापरल्याने हिंदी भाषेचं आक्रमण कमीतकमी इंटरनेट पुरतं तरी बंद होईल. आणि शिवाय मराठी भाषेत आपली खूपच मोठी सोय होईल.

चला मग! गुगल वर आपला मराठी झेंडा फडकवा आणि जास्तितजास्त मराठीचा वापर करा.

No comments:

Post a Comment