9 February 2014

अभ्यास खिशात!

आपल्या खिशात स्मार्टफोन असतोच. त्याचा वापर आपण आपल्या योग्य त्या गोष्टींसाठी केला तर इतरांना ऐषोरामाची वाटणारी ही गोष्ट आपल्याला खूप उपयुक्त ठरू शकते आणि त्याचा वापर आपण आपल्या विकासासाठी करू शकतो. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उपयुक्त असे अनेक अ‍ॅप्स अँड्रॉइड स्टोअरवर उपलब्ध आहेत. ज्याचा वापर करून आपण आपल्या महाविद्यालयातील अभ्यासापासून ते व्यवस्थापनापर्यंत अनेक गोष्टी अधिक सोप्या करू शकतो.
* गुगल प्ले बुक्स
तुमच्या अभ्यासाची अनेक पुस्तके महाग असतात. ही सर्व पुस्तके सर्वानाच विकत घ्यायला जमतात असे नाही. अशा वेळी तुम्ही ग्रंथालयाची मदत घेता. हे ग्रंथालय आता तुमच्या मोबाइलमध्ये उपलब्ध असून तुम्हाला अपेक्षित सर्व पुस्तके गुगल प्ले बुक्स या अ‍ॅपवर उपलब्ध होऊ शकतात. या अ‍ॅपमध्ये पुस्तक भाडय़ावर मिळते. हे भाडे अगदी मोजके असून ते पुस्तक तुम्हाला १८० दिवसांसाठी वापरता येऊ शकते. ही पुस्तके डाऊनलोड करण्यासाठी तुमच्याकडे चांगली बॅटरी लाइफ असलेला फोन असणे आवश्यक आहे. तसेच ती सेव्ह करण्यासाठी जागा असणेही आवश्यक आहे. ही पुस्तके सेव्ह करण्यासाठी जागा तुलनेने जास्त लागते. ही पुस्तके वाचण्यासाठी मोबाइलमध्ये पीडीएफ रीडर असणेही आवश्यक आहे.
हे अ‍ॅप आपल्याला अँड्रॉइड, आयफोनवर उपलब्ध आहे.
* एव्हरनोट
तुम्ही अनेकदा वर्गात नोट्स लिहिण्यासाठी वहीचा वापर करता. पण तुम्हाला तुमचे एखादे प्राध्यापक वर्गाच्या बाहेर भेटले आणि तिथे त्यांनी काही महत्त्वपूर्ण माहिती सांगितली, तर ती माहिती तुम्ही पटकन तुमच्या मोबाइलमध्ये टाइप करून सेव्ह करून ठेवू शकता. यामध्ये तुम्हाला एव्हरनोट नावाचे अ‍ॅप्लिकेशन उपयुक्त ठरू शकते. यामध्ये तुम्ही वेगवेगळे विभाग करून तुमच्या नोट्स लिहून ठेवू शकतात. इतकेच नव्हे तर तुम्ही फोटो काढून तो सेव्हही करून ठेवू शकता. यासाठी हे अ‍ॅप एकदम चांगली सुविधा देते आणि ते वापरण्यासाठीही खूप सोपे आहे. आपण जर एखाद वेळी वर्गात बसलो नाही तर आपल्या वर्गमित्राच्या नोट्सचा फोटो आपण यामध्ये सेव्ह करू शकतो. हे अ‍ॅप आपण ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने वापरू शकतो.
हे अ‍ॅप आपल्याला अँड्रॉइड, विंडोजफोन आणि आयफोनवर उपलब्ध आहे.
* ड्रॅगन मायक्रोफोन
तुमच्या वर्गात प्राध्यापक शिकवत असतील त्या वेळी तुम्हाला लिहून घेणे शक्य नसेल तर तुम्ही या अ‍ॅपचा वापर अगदी बिनधास्त करू शकतात. कारण हे अ‍ॅप स्पिक टू टेक्स्ट या फॉरमॅटमधील असून यामध्ये बोललेली गोष्ट टाइप होत जाते. हे अ‍ॅप सुरू केल्यावर तुम्हाला वायरलेस हेडफोन आवाजाच्या दिशेला ठेवायचा आहे. मग तुमचे काम झालेच म्हणून समजा. यामध्ये तुमचे शिक्षक सांगत असलेली प्रत्येक गोष्ट टाइप होत जाते व ते सेव्ह झाल्यावर आपण नोट्स म्हणून टाइप झालेल्या गोष्टीचा वापर करू शकतो. हे अ‍ॅप फ्री असून त्याचा वापर फ्रान्समध्ये सर्वाधिक होत आहे.
हे अ‍ॅप आपल्याला अँड्रॉइड, आयफोनवर उपलब्ध आहे.
* ऑडिओ नोट
तुम्हाला तुमच्या वर्गातील नोट्स किंवा समूह चर्चेतील गोष्टी नोट्सच्या स्वरूपात सेव्ह करून हव्या असतील तर तुम्ही ऑडिओ नोट नावाचे हे अ‍ॅप अगदी बिनदिक्कतपणे वापरू शकतात. यामध्ये इलबिल्ट व्हॉइस रेकॉर्डर देण्यात आला आहे. ज्याचा वापर करून आपण ऑडिओ सेव्ह करू शकतो. एकदा का रेकॉर्डिग सेव्ह झाले की त्यावर आपण टॅप करायचे. मग त्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला टाइप झालेल्या दिसतील. याचा लेआऊटपण इतका सुंदर देण्यात आला आहे की ज्याचा लूक अगदी नोट्स सारखाच आहे. हे नोट्स आपल्याला ई-मेल करता येऊ शकतात. यासाठी आपण टेक्स्ट किंवा ऑडिओ हे दोन्ही फॉरमॅट वापरू शकतो.
हे अ‍ॅप आपल्याला अँड्रॉइड, आयफोनवर उपलब्ध आहे.
* क्विकोऑफिस प्रो एचडी
महाविद्यालयांमध्ये सध्या प्रकल्पांना मोठी मागणी असते. आपल्याला प्रत्येक विषयासाठी किमान एक तरी प्रकल्प करून तो सादर करावा लागतो. हा प्रकल्प आपण अगदी आपल्या फावल्या वेळात मोबाइलवरही बनवू शकतो. यासाठी आपल्याला क्विकोऑफिस प्रो एचडी हे अ‍ॅप उपयुक्त ठरू शकते. यामध्ये आपल्याला वर्ल्ड, एक्सेल आणि पॉवर पॉइंट मिळते, ज्याचा वापर आपण आपले विविध डॉक्युमेंट्स सेव्ह करून ठेवून शकतो. हे सेव्ह करण्यासाठी हे अ‍ॅप गुगल ड्राइव्ह, ड्रॉपबॉक्स, एव्हरनोट, शुगर सिंक अशा विविध क्लाऊड अशा विविध सोयी उपलब्ध आहेत. यामुळे आपण आपल्या फाइल्स इतर कुठेही ओपन करू शकतो. या अ‍ॅपच्या माध्यमातून आपण सेव्ह केलेल्या फाइल्स एडिट, सेव्ह आणि शेअर करू शकतो. लवकरच हे अ‍ॅप आपल्याला गुगल क्रोम या ब्राऊजवरही उपलब्ध होणार आहे.
हे अ‍ॅप आपल्याला अँड्रॉइड, आयफोनवर उपलब्ध आहे.
* माय होमवर्क
माय होमवर्क हे अ‍ॅप आपल्याला आपल्या गृहपाठाची आठवण करून देत असते. या अ‍ॅपचा वापर करून आपण आपल्या वर्गाचे आणि अभ्यासाचे वेळापत्रक चांगल्या प्रकारे मांडू शकतो आणि ते ठरवू शकतो, ज्याचा फायदा आपल्याला गृहपाठ वेळेवर पूर्ण करण्यासाठी होऊ शकतो. यामध्ये आपण वर्षभर केलेल्या अभ्यासाची एकत्रित यादीही उपलब्ध होते. यामुळे आपल्याकडे संपूर्ण तपशील केव्हाही मिळू शकतो. याचा फायदा आपला परफॉर्मन्स तपासण्यासाठीही होतो.
हे अ‍ॅप आपल्याला अँड्रॉइड, आयफोनवर उपलब्ध आहे.
* डिक्शनरी डॉट कॉम
आपल्याला अभ्यास करत असताना अनेक शब्दांचे अर्थ समजणे कठीण जाते. अशा वेळी आपण कपाटात कुठेतरी ठेवलेली डिक्शनरी शोधायला जाणार आणि नंतर आपण त्यातील शब्द शोधणार व अर्थ समजून घेणार. यापेक्षा आपण डिक्शनरी डॉट कॉम हे अ‍ॅप आपल्या मोबाइलमध्ये लोड केले की तेथे आपल्याला पाहिजे त्या शब्दांचे अर्थ मिळू शकतात. इतकेच नव्हे तर आपल्याला त्या शब्दाशी संबंधित म्हणी, वाक्प्रचार अशा अनेक गोष्टीही मिळतात. यामुळे त्या शब्दाचा पूर्ण अर्थ समजण्यास आपल्याला मदत होते.
हे अ‍ॅप आपल्याला अँड्रॉइड, आयफोनवर उपलब्ध आहे.

घरगुती 'अ‍ॅप्स'

मोबाइल फोनचा नवा अवतार असलेल्या स्मार्टफोननं एव्हाना वापरकर्त्यांचं जग व्यापून टाकलं आहे. कॉलिंग, ईमेल, एसएमएस, व्हॉट्सअ‍ॅप, चॅट, फेसबुक या संवाद प्रकारांसोबतच स्मार्टफोन हा अन्य कारणांसाठीही उपयुक्त ठरत आहे. मग ते रेल्वे-बसचं वेळापत्रक पाहणं असो किंवा सिनेमाचं तिकीट बुक करणं असो, गेम्स खेळणं असो की नेटबँकिंग करणं असो, दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींवर उत्तर शोधण्यासाठी स्मार्टफोन हा अतिशय चांगला जोडीदार बनत चालला आहे. स्मार्टफोनची ही उपयुक्तता केवळ नोकरदार, तरुण-तरुणी किंवा उद्योजकांपुरतीच मर्यादित राहिलेली नाही. तर चोवीस तास घरात राहून संपूर्ण कुटुंबाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या गृहिणींसाठीही स्मार्टफोन हा मार्गदर्शक मित्र बनत चालला आहे. आर्थिक नियोजनापासून ते गृहसजावटीपर्यंत अनेक गोष्टी स्मार्टफोनवरील अ‍ॅप्सच्या मदतीने सहज हाताळता येत आहेत. अशाच काही अ‍ॅप्सविषयी:
हाउझ्झ इंटेरिअर डिझाइन आयडियाज
'सीएनएन'ने 'अंतर्गत व बाह्य गृहसजावटीचा विकिपीडिया' असा गौरव केलेले हे 'अ‍ॅप' गृहसजावटीसाठी अत्यंत उपयुक्त असे अ‍ॅप्लिकेशन आहे. गुगल प्ले स्टोअर किंवा अँड्रॉइड मार्केटमधून हे मोफत डाऊनलोड करता येतं. घराची रचना, फर्निचरची मांडणी, रंगसंगती, पडद्यांचे प्रकार, प्रत्येक खोलीची विशिष्ट आखणी अशा गृहसजावटीबाबतच्या सर्व गोष्टींबाबतच्या टिप्स या अ‍ॅप्लिकेशनवर मिळतात. आकर्षक गृहसजावटीची तब्बल वीस लाख छायाचित्रेही या अ‍ॅपवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. अर्थात यापैकी अनेक छायाचित्रे मोठमोठे बंगले किंवा अपार्टमेंटच्या गृहसजावटीशी संबंधित असली तरी त्यातून आपल्या घराला शोभतील अशी रचना करणे सहज शक्य आहे.
एक्स्पेन्स मॅनेजर
फेब्रुवारी-मार्च महिना आला की सरकारी यंत्रणांपासून ते कंपन्यांपर्यंत सर्वाना वेध लागतात अर्थसंकल्पाचे. पण सर्वसामान्य गृहिणींचा अर्थसंकल्प हा रोज घडत-बिघडत असतो. येणारे उत्पन्न आणि जाणारा खर्च यांचा ताळमेळ जुळवत संसाराची गाडी व्यवस्थितपणे हाकण्याची किमया त्यांना करावी लागते. अशा वेळी एक्स्पेन्स मॅनेजर हे अ‍ॅप्लिकेशन चांगल्या मदतनीसाचे काम करते. या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या जमाखर्चाचा साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक हिशोब ठेवू शकता. दरमहा येणारे उत्पन्न आणि दैनंदिन खर्च यांची नोंद या अ‍ॅपमध्ये करावी लागते. त्यानंतर हे अ‍ॅप्लिकेशन आपल्याला वेळोवळी संपूर्ण हिशोब उपलब्ध करून देते. दुधवाला, कामवाली बाई, पेपरबिल अशा मासिक खर्चाची नोंद करण्यासाठीही येथे वेगळा 'सेक्शन' आहे. याशिवाय फोनबिल, वीजबिल, गृहकर्जाचा हप्ता यांच्या निर्धारित तारखेपूर्वी हे अ‍ॅप्लिकेशन आपल्याला पूर्वसूचना देते. अकाऊंट ट्रान्सफर, ऑटो फिल, कल्क्युलेटर, टॅक्स या गोष्टींचीही नोंद या अ‍ॅपवर करता येते.
हेल्थकार्टप्लस
औषधांच्या दुकानांमध्ये फार्मसिस्ट ठेवण्याची सक्ती झाल्यापासून दुकानदारांनी प्रीस्क्रिप्शनशिवाय औषधे देणे बंद केले आहे. तर डॉक्टरमंडळी ठरावीक कंपन्यांची महागडी औषधे लिहून देऊन रुग्णांच्या खिशाला कात्री लावतात. मात्र यापैकी कोणीही संबंधित औषधाचे उपयोग-दुरुपयोग किंवा अन्य बारीक तपशील सांगण्याच्या फंदात पडत नाही. अशा वेळी 'हेल्थकार्टप्लस' हे अ‍ॅप्लिकेशन तुमच्या घरातील औषधांचे व्यवस्थापन करण्यासाठी उपयोगी ठरते. सर्व जेनेरिक औषधांची यादी या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेल्या औषधांइतकीच प्रभावी पण स्वस्त औषधे तुम्हाला या अ‍ॅपवरून शोधता येतील. या औषधांचे गुणधर्म, त्यांतील घटक, ती घेण्यापूर्वी घ्यावयाची काळजी, पथ्य ही सर्व माहिती जोडीला उपलब्ध आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुम्ही या अ‍ॅपच्या माध्यमातून औषधे मागवूही शकता. केवळ त्यासाठी तुमच्या डॉक्टरांनी दिलेले प्रीस्क्रिप्शन तुम्हाला येथे अपलोड करावे लागते. तुमच्या विभागाचा पिनकोड नोंदवताच त्या भागात औषध उपलब्ध आहे की नाही, याची माहितीही या अ‍ॅपमधून मिळते.      -प्रतिनिधी
'स्मार्ट कुक' बना!
अन्य गृहोपयोगी गोष्टींप्रमाणेच स्वयंपाकाशी संबंधित अनेक अ‍ॅप्स अँड्रॉइडवर उपलब्ध आहेत. या अ‍ॅप्लिकेशन्सवर खाद्यपदार्थाच्या लाखो रेसिपीस, स्वयंपाकाच्या टिप्स उपलब्ध आहेत. यापैकी 'स्वीटन्स्पाइसी- इंडियन रेसिपीज', 'हिंदी रेसिपीज' आणि 'तरला दलाल रेसिपीज' ही अ‍ॅप्लिकेशन्स अतिशय चांगली आहेत. तरला दलाल हे नाव सर्वाना परिचित आहेच. टीव्हीच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या तरला दलाल यांच्या लज्जतदार रेसिपी या अ‍ॅपवरून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत या अ‍ॅपच्या वापरकर्त्यांची संख्या तीस लाखांवर पोहोचली आहे. त्याचप्रकारे स्वीटन्स्पाइसी हे अ‍ॅप्लिकेशन भारतीय पदार्थाच्या पाककृतींसाठी विशेष अ‍ॅप्लिकेशन आहे. या अ‍ॅपवर तब्बल साडेसात हजार पाककृती असून सुमारे बाराशे पाककृतींबाबतचे व्हिडीओही उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या सर्व पाककृतींची शाकाहारी-मांसाहारी, चव, बनवण्याची वेळ, घटक जिन्नस यानुसार वर्गवारी करण्यात आली आहे. त्यामुळे कोणतीही पाककृती शोधणे फार कठीण नाही. आणखी एक बाब म्हणजे, या अ‍ॅपवर गृहिणींसाठी वेगवेगळय़ा टिप्सही उपलब्ध आहेत. इंग्रजीशी फारसे सख्य नसलेल्या गृहिणींसाठी 'हिंदी रेसिपीज' हे अ‍ॅप्लिकेशन चांगला पर्याय आहे. 

मुलांसाठी आहाराची पाठशाळा

अर्चना रायरीकर, आहारतज्ज्ञ

आजकाल शालेय अभ्यासक्रमात पोषणशास्त्र आणि चांगला आहार या विषयी धडे टाकलेले आढळून येतात. अनेक शाळांमधून मुलांना पौष्टिक नाश्ता आणि जेवण देखील दिलं जातं. अनेक शाळांत आहारतज्ज्ञ देखील असतात. ज्या शाळांत मुलांना जेवण दिलं जातं तिथल्या एका पालकांनी एक प्रातिनिधिक मत व्यक्त केलं. त्यांच्या मते मुलांना शाळेत सर्व भाज्या खायला लावल्या जातात. एखादी भाजी मुलांनी पानात टाकली किंवा आवडत नाही म्हणून सांगितलं, तर परत तेवढीच भाजी पानात वाढली जाते. असं झालं की मुलं सगळ्या भाज्या नीट खाऊ लागतात. हा झाला एक प्रकार. काही शाळांत मुलांच्या मेन्यूमध्ये पावभाजी, चायनीज वगैरे पदार्थही असतात. कारण एकच, मुलांना ते पदार्थ आवडतात.

मध्यंतरी काही जणांकडून अजून एक प्रकार ऐकला, तो म्हणजे काही ठिकाणी मुलांना शाळा सुटताना एनर्जी बार दिले जातात. त्यामुळे त्या कंपनीची जाहिरात होते म्हणे! पालकांना प्रश्न पडला, की असे प्रकार द्यावेत की नाहीत? त्या बार्सवर घटक लिहिलेले होते. त्यामध्ये कृत्रिम रंग आणि स्वाद होते. मग असे पदार्थ मुलांना द्यावेत का? विविध शाळांमध्ये असे अनेक प्रकार दिसतात. अजून एक प्रकार मी पाहिला आहे. साधारणपणे मध्यम किंवा उच्च मध्यमवर्गीय मुलं असलेल्या शाळांमध्ये प्रेझेंटेशन्स होतात. ही प्रेझेंटेश्न्स हेल्थ ड्रिंकच्या कंपन्या देतात. त्यांचे आहारतज्ज्ञ प्रेझेंटेशन देतात. त्यामध्ये सुरुवातीला योग्य आहाराबद्दल माहिती असते. मग हळूहळू त्याचं जे काही प्रॉडक्ट आहे, त्याबद्दल माहिती दिली जाते. शेवटी आमच्या या प्रॉडक्टमध्ये हे गुण आहेत, त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलाला ते नक्की द्या, असं मार्केटिंग करून पालकांना ते विकलंही जातं. मुळात आपल्याकडे जी काही हेल्थड्रिंक आहेत, त्यामध्ये ८० टक्के साखर असते. बाकी थोडी जीवनसत्त्व आणि क्षार, जोडीला कृत्रिम रंग आणि स्वाद असतात. आणखी एक मोठी गोष्ट असते, ती म्हणजे मोठमोठे दावे!

काही शाळांमध्ये पोषक आहार दिला जात नाही आणि अशा प्रकारच्या पदार्थांचं मार्केटिंगही होत नाही. शाळेची कमिटी काही निर्णय घेते. उदा. डब्यात रोज पोळी-भाजीच हवी किंवा आठवड्यातून एकदा सलाड किंवा फळं हवीत वगैरे. काही शाळा मॅगी, चिप्सवर बंदी घालतात. काही शाळा मुलांना आरोग्यपूर्ण पदार्थ तयार करणंही शिकवतात.
मुलांच्या आहार ज्ञानाचे दोन भाग आहेत, एक म्हणजे योग्य आहाराची माहिती देणं. दुसरा म्हणजे ते प्रत्यक्षात अमलात येत आहे की नाही, हे पाहाणं. यासाठी ही माहिती केवळ मुलांनाच नव्हे, तर शिक्षक आणि पालक यांनादेखील द्यायला हवी. मुलं ही ओल्या मातीसारखी असतात आणि याच काळात आपण त्यांना घडवू शकतो. यासाठीच शाळांमधून योग्य असं आहार शिक्षण देणं गरजेचं आहे. पालकांना नसणारा वेळ, सगळीकडे फास्टफुडचं असलेलं आकर्षण आणि त्याच्या अगदी विरुद्ध म्हणजे उठसूठ महागड्या शक्तीवर्धक गोळ्या आणि प्रोटिन पावडर खपवण्याची व घेण्याची चढाओढ, यात खाण्यातील नैसर्गिकपणा, शुद्धता, शिस्त सर्वच हरवत चाललं आहे. आपण मुलांचे अभ्यास, विविध उपक्रम यांना खूप महत्त्व देतो. तितकं महत्व आहाराला देत नाही. सध्या चुकीचा आहार आणि कमी व्यायाम यामुळे अनेक विकार बळावत चालले आहेत. मुलगा खूप शिकला, इंजिनीअर होऊन अगदी लाखो रुपये मिळवू लागला; पण त्याला २५व्या वर्षी मधुमेह झाला असं व्हायला नको. यासाठी आहाराची पाठशाळा हवीच. 

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी व्यायाम

स्थूल मंडळींना 'सिट अप' काढणे शक्य होतेच असे नाही. ओटीपोटाचे स्नायू बळकट करण्यासाठी स्थूल व्यक्ती खालील व्यायाम करू शकतील. पोटावरील चरबी कमी करण्यासाठीही या व्यायामांमुळे काही प्रमाणात फायदा होतो.
व्यायाम १ :
पाठीवर झोपा. पाय गुडघ्यात वाकवून ते जमिनीला समांतर राहतील अशा पद्धतीने वर उचला. या वेळी जमीन आणि मांडय़ा यांच्यातील कोन ९० अंशांपेक्षा कमी राहावा (छायाचित्र क्र. १). अशा अवस्थेत २० आकडे म्हणून होईपर्यंत थांबा. पुन्हा मूळ स्थितीत या. ओटीपोटाचे स्नायू आकुंचन पावल्यासारखे वाटेल.

व्यायाम २ :
 पाठीवर झोपा. मांडी आणि गुडघ्यांच्या खाली एक उशी ठेवून गुडघ्यापासून खालचे पाय थोडे वर उचलून जमिनीला समांतर ठेवा (छायाचित्र क्र. २). या अवस्थेत गुडघ्यांना किंचितसा बाक राहील. पाय वर समांतर ठेवलेल्या अवस्थेत १० आकडे मोजेपर्यंत थांबा. हा व्यायाम साधारणपणे १० वेळा करा.

डॉ. अभिजित जोशी, अस्थिरोगतज्ज्ञ

ऑनलाइन खरेदीसाठीच्या टिप्स

ऑनलाइन खरेदी हा सहजसोपा पर्याय असल्याने त्याला मिळणारी पसंती दिवसेंदिवस वाढतेच आहे. पण त्यात काही धोकेही असतात. अनेकांची फसवणूक होते वस्तू चुकीची मिळते बिल भरूनही वस्तू हाताशी येत नाही वगैरे अनुभव अनेकांना येतात. ऑनलाइन खरेदी करताना घ्यावयाची खबरदारी अनेक ठिकाणी दिलेलीही असते. त्याकडेही दुर्लक्ष करणाऱ्यांच्यासाठी ऑनलाइन खरेदी करताना घ्यावयाच्या या काही टिप्स... 
... 

वेबसाइटना विक्री करताना डिस्ट्रिब्युटर रिटेलरचे कमिशन द्यावे लागत नाही त्यामुळे वस्तू स्वस्तात मिळतात. पण ऑनलाइन खरेदी करताना केवळ वस्तू स्वस्तात मिळते म्हणून खरेदी करू नका. ही खरेदी करताना वस्तूचा विक्रेता विक्रीसाठीच्या अटी-नियम काळजीपूर्वक वाचा. काही ठिकाणी विक्रेत्या वेबसाइटची वॉरंटी मिळते तर काही ठिकाणी उत्पादकाची. उत्पादकाच्या सर्विस सेंटरचे जाळे मोठे असल्याने नक्कीच ती वॉरंटी अधिक फायदेशीर असते. बिलाच्या रकमेमध्ये व्हॅटचे पैसे समाविष्ट केले आहेत किंवा नाहीत याचीही माहिती करून घ्या. व्हॅटसह बिल नसेल तर सर्विस सेंटरवर प्रॉब्लेम येऊ शकतो. शक्यतो कॅश ऑन डिलिव्हरी याच पर्यायाची निवड करा. जेणेकरून नंतर विचार बदलल्यास वस्तू परत करता येते किंवा हवी असल्यास वस्तू ताब्यात घेतल्यावर पैसे देता येतात. 

* रिव्ह्यु वाचा 

कुठलीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी इतरांच्या त्याविषयीच्या प्रतिक्रिया काळजीपूर्वक वाचा. गुगलवर त्या वस्तूविषयी सर्च दिल्यावर शक्यतो सुरुवातीच्या ५ प्रतिक्रिया सोडून इतर वाचा जेणेकरून संतुलित माहिती मिळेल. सोबतच विक्री करणारी वेबसाइट सुरक्षित आहे ना त्या वेबसाइटविषयी इतरांच्या प्रतिक्रिया कशा आहेत हे नीट पहा. वस्तूंच्या किमतीची विविध वेबसाइट तुलना करून पहा. त्यासाठी mysmartprice.com या वेबसाइटची मदत घेऊ शकता. ऑनलाइन खरेदी करताना खूप ऑफर्सही मिळतात. त्यांची माहितीindiafreestuff.com या वेबसाइटवरून घेऊ शकता. 

* लिंक तपासून पहा 

खरेदी करताना किंवा बिल भरताना वेबसाइटच्या अॅड्रेस पूर्वी https किंवा लॉकचे चिन्ह आहे ना याची खात्री करा. अशा लिंक वरून केलेले व्यवहार अधिक सुरक्षित असतात. तसेच लिंकचा पत्ता काळजीपूर्वक वाचा. काही फसवे लोक लिंकचा अड्रेसमध्ये सुरुवातीचे शब्द मूळ वेबसाइट प्रमाणे ठेवतात मात्र नंतरच्या शब्दांमध्ये बदल करून फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. तसेच मोबाइलमध्ये क्रेडीट कार्डची माहिती सेव्ह करून ठेवू नका. 

प्रॉब्लेम्स शेअर करणारी वेबसाइट

अभ्यासाचं टेन्शन असो वा मित्र-मैत्रिणींची भांडणं, रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम, ब्रेकअप, बॉसची कटकट, कामाचा ताण अशा अनेक प्रॉब्लेम्सना आपण दररोज सामोरे जातो. मात्र, याबाबत आपण कोणाशीही बोलत नसल्याने मनाची घुसमट होते. त्यामुळे युवक व युवतींच्या अशा अनेक समस्यांवर सोल्युशन म्हणून चार तरुणांनी 'शेअरिंग दर्द डॉट कॉम' ही वेबसाइट तयार केली आहे. तिच्या माध्यमातून सध्या ९० हजारांहून अधिकजण आपले प्रॉब्लेम्स शेअर करत आहेत. त्यांना जॉब व लव्ह अँड रिलेशनशिप दर्दचे प्रॉब्लेम आहेत. 

या वेबसाइटवर तुम्ही तुमच्या मनातील कोणतीही गोष्ट शेअर करू शकता. तुम्हाला येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी इथले मित्र तुम्हाला मदत करतात आणि तेही मोफत. कारण तेही तुमच्यासारखेच समदु:खी असतात. विशेष म्हणजे इथे तुमची ओळख गुप्त ठेवली जाते. तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शनही मोफत मिळते. अर्थात सल्ला मोफत मिळतो, मानसोपचार हवे असल्यास मात्र डॉक्टरांची फी द्यावी लागते. आयआयएम लखनौमधून शिक्षण घेतलेल्या रितिका शर्मा, सुमंत गजभिये, गौरव राजन आणि लिमा जेम्स या चार मित्रांनी या वेबसाइटची निर्मिती केली आहे. सध्या हे चौघेही मुंबईतच असतात. दोन वर्षांच्या प्रयत्नातून त्यांनी ही वेबसाइट आठ महिन्यांपूर्वी तयार केली आहे. 

या वेबसाइटवर १६ तज्ज्ञ डॉक्टरांची टीम समुपदेशनाचे काम करते. मुंबईमधील तरुणांना आय एम फिलिंग लोनली दर्द हा प्रॉब्लेम अधिक आहे, तर कोल्हापुरातील तरुणांना जॉब व लव अँड रिलेशनशिप दर्द आहे. या वेबसाइटवर सहा प्रकारची विभागणी केली असून जॉब अँड करिअर दर्द, आय एम फिलिंग लोनली दर्द, लव अँड रिलेशनशिप दर्द, सोशल अँड फॅमिली दर्द, मेट्रोमोनी सर्च दर्द, सोशल तेबू दर्द असे आहेत. 

एकटेपणा, डिप्रेशन, घुसमट हे सारे बोलण्यासाठी हक्काची जागा हवी असे त्यांना वाटायचे. त्यातूनच तयार केली एक वेबसाइट 'शेअरिंग दर्द डॉट कॉम'. यामुळे अनेकांना आपले मन मोकळे तर करता येतेच, शिवाय टेन्शन फ्री जीवन जगण्याची नवीन दिशा मिळत आहे.

कार खरेदीच्या पंचसूत्री

कार खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना मॅन्युफॅक्चर्स वा डिलर्स विविध सवलतींची खैरात करीत असतात. त्याचा लाभ घेताना खालील पाच बाबी लक्षात घ्या. 

नवे वर्ष, जुने मॉडेल 

साधारणातः कार कंपन्या गाड्यांच्या किमती वाढवण्यापूर्वी किंवा नव्या वर्षात जानेवारीमध्ये कारची नवी मॉडेल्स बाजारात आणण्यापूर्वी कारचा शिल्लक स्टॉक डिसेंबरच्या महिन्यात विकण्यासाठी काढतात. अशी कार विकत घ्यायला गेलात तर त्याचे मॉडेल काही दिवसांत गेल्या वर्षीचे मॉडेल ठरते. ही कार पुढील ७-८ वर्षे वापरणार असाल तर ठीक पण, ३-४ वर्षांत विकणार असाल तर या कारचे मॉडेल सन २०१३चे ठरते आणि त्याची रिसेलची किंमत कमी होते. त्यामुळे नवे वर्ष सुरू होईपर्यंत थांबा. नव्या कारची किंमत पुरेपूर वसूल होण्यास ८ वर्षांचा कालावधी लागतो. त्याचा पुरेपूर वापर करा. 

खिशाला परवडेल का बघा! 

मोठी कार मोठ्या सवलती असे आमिषाचे स्वरूप असते. पण, सवलतींचा आपल्या खिशावर परिणाम होऊ देऊ नका. कारची किंमत तुमच्या हाती येणा‍ऱ्या वार्षिक उत्पन्नाच्या ६० टक्क्यांपेक्षा जास्त असू नये. समजा. तुमचा हातात येणारा पगार ६० हजार आहे तर तुमच्या कारची किंमत ४.३२ लाखांपेक्षा जास्त नको. कारच्या कर्जावरील हप्ता हा तुम्ही दरमहा करभरल्यानंतर उरलेल्या पैशांच्या फक्त १५ टक्केच असायला हवा. किंवा सगळा खर्च आणि गुंतवणूक करून उरलेल्या पैशांच्या ४० टक्के इतकाच असावा. 

ऑफर बारकाईने पहा 

डिलर सवलती अधिक आकर्षक करण्यासाठी काही युक्त्या करीत असतात पण, त्यात फसू नका. जिलर अॅक्सेसरीजचे महत्त्व विनाकारण वाढवून ठेवतात. अॅक्सेसरीत गळ्यात टाकतात. त्यामुळे कुठल्या अॅक्सेसरीज हव्यात ते नीट पहा. फ्री अॅक्सेसरीजपेक्षा कॅश स्वरुपात सवलत मागा. एक्स्चेंज ऑफरच्या भानगडीत अजिबात पडू नका. जुन्या कारची किंमत ते कमी करतात. उलट तुम्हाला इतरत्र जास्त किंमत मिळू शकेल. त्यापेक्षा olx.inसारख्या वेबसाइटचा वापर करा. तुम्हाला योग्य किमतीत कार खरेदीदार उपलब्ध होईल. 

नो क्लेम बोनस 

यावर्षी कुठलाही क्लेम केला नाही तर पुढच्या वर्षी प्रिमियममध्ये सवलत मिळते हे सर्व कारमालकांना माहिती असते. पण, नोक्लेम बोनस दुस‍ऱ्या वाहनासाठीही ट्रान्स्फर करता येतो. त्यामुळे नव्या कारचा विमा कमी होऊ शकतो, हे अनेकांना माहिती नसते. जुनी कारच्या विक्रीकराराची फोटोकॉपी, ट्रान्स्फरची कागदपत्रे, विम्याची कागदपत्रे, कारचे नोंदणीपत्र आदी कागदपत्रे दिली तर नव्या कारच्या विम्यात सवलत मिळू शकते. समजा नव्या कारच्या विम्याची किंमत १५ हजार रुपये असेल तर ५० टक्के नोक्लेम बोनसमुळे विम्यासाठी ७,५०० रुपयेच भरावे लागेल. विम्याच्या तारखेपासून तीन वर्षे हे सर्टिफिकिट वैध ठरते. पण, जुन्या कारचा विम्याचा नोक्लेम वापरत असल्याचे मात्र ही गाडी खरेदी करणा‍ऱ्या ग्राहकाला स्पष्ट सांगितले पाहिजे. कारण कारसोबत विमाही येतो असे गृहित धरले जाते. 

पेट्रोल, डिझेल की सीएनजी? 

इंधनांमध्ये पेट्रोल सर्वाधिक महाग असते पण, पेट्रोलच्या कारची किंमत कमी असते. डिझेल तुलनेत स्वस्त असते पण, डिझेलवर चालणारी कार तुलनेत जास्त महाग म्हणजे किंमत ७५ हजार ते १ लाख रुपयांनी अधिक असते. या कारचा मेंटेनन्सही अधिक असतो. तुम्ही दररोज किती प्रवास करता यावर कार कुठली घ्यायची हे ठरवा. दररोज ८० किमीपेक्षा जास्त प्रवास करीत असाल तर डिझेलवर चालणारी कार विकत घ्या. या कारसाठी मोजलेले जास्तीचे पैसे दोन वर्षांत वसूल होऊ शकतात. सीएनजी हे प्रदूषणमुक्त ‌इंधन आहे पण, त्याची उपलब्धी ही समस्या ठरू शकते. सीएनजी सि‌लिंडर जागा जास्त घेतो, ही बाजूही लक्षात घ्या.